पिंपरी दि. ८ (पीसीबी) – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांच्या आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही या विधानाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. दोन व्यक्तींनाच काय कोणीच कोणाला शिव्या देवू नये, शिव्या देवून काय नोकरी लागणार आहे का, उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाले म्हणून ते नाराज असतील किंवा त्यांचे नियंत्रण राहिले नसल्याचा हल्लाबोल पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांबाबत अजित पवार यांनी आज (शनिवारी) अधिका-यांसोबत बैठक घेतली. कामांचा आढावा घेतला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, कार्याध्यक्ष श्याम लांडे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, अतुल शितोळे, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ”काय आता हे विनाशकाले विपरित बुद्धी म्हणायची वेळ आली. शिव्या देवून काय नोकरी लागणार आहे, बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का, एवढ्या महत्वाच्या पदावर असणा-या व्यक्तींनी अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य करणे हे बरोबर नाही. खरोखरीच ते नाराज असतील कदाचित की उच्च व तंत्रशिक्षण खाते मिळाले म्हणून, काय त्यांचे नियंत्रण राहिले नाही की काही कळेना.
ज्यावेळी 105 जागा निवडणून येवूनही भाजपचे सरकार आले नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वखालील सरकार आल्यानंतर त्यांनी (भाजपने) कोणाला तरी सोबत घेवून आपले (भाजपचे) सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याकरिता अडीच वर्षे गेली. हे सिद्ध झाले. मोठी शक्ती, ताकद असल्याशिवाय एकनाथ शिंदे हे एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस करुच शकत नाहीत, असेही पवार म्हणाले.