– शिवसेनेची ९ लाख प्रतिज्ञापत्र, तर शिंदे गटाची फक्त दीड लाख
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाचा निर्णय शुक्रवारी (ता.7) होणार होता. दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर असलेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे एकही कागद सादर केला नाही, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधिमंडळ पक्ष सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचे शिंदे गट सातत्याने सांगत आहे, तर शिवसेना पक्षाची कार्यकारिणी व पदाधिकारी हे आपल्यासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागवून घेतला होता. उर्वरित कागदपत्रे 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले होते. शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची ठाकरे गटाने मागणी केली होती. त्यामुळे वेळ वाढवून देण्यात आला होता. शिंदे गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुमारे दीड लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने 8 ते 9 लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. पक्षातील बहुमत कोणाकडे आहे या मुद्द्याआधारे निवडणूक आयोग साधारणपणे निर्णय घेतो.
धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचारविनिमय सुरु आहे. ठाकरे गटाकडून सध्या ढाल आणि तलवार चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी एक तलवारही व्यासपीठावर आणण्यात आली होती. ही त्याची तयारी असल्याची चर्चा आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आजपासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. हे पाहता धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आता सुनावणी कधी घेणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.