मयत व्यक्तींची मतदान प्रक्रियेतून नावे काढण्यासाठी अनिवार्य कायदा करा – चिन्मय कवी

0
192

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – मतदार यांद्यामध्ये मृत व्यक्तींची नावे अनेक वर्षांपासून तशीच कायम दिसतात. त्याची संख्या एकूण मतदार संख्येच्या 4 टक्के इतकी आहे. त्यामुळे मयत व्यक्तींची मतदान प्रक्रियेतून नावे काढण्यासाठी अनिवार्य कायदा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कवी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर चिन्मय कवी यांंच्या मागणीचा गांभिर्याने विचार करण्याची ग्वाही दिली आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील ही मागणी रास्त असल्याने त्यावर ठोस निर्णय करण्याचे आश्वासन कवी यांना दिले आहे. या मागणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत असून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चा केल्याची माहिती कवी यांनी पीसीबी टुडे ला दिली.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात कवी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात (2017-2019)पर्यंत एकूण मतदारसंख्या 8 कोटी 40 लाख इतकी आहे. या संबंधी समस्येचा निवडणूक प्रक्रियेतील गैरवापर होऊ शकतो. तसेच राज्याच्या आर्थिक व शासकीय धोरणांवर देखील विपरीत परिणाम दिसतो.

मतदार नोंदणी 1960 नियम 13 (2) या कायद्याअंतर्गत वय वर्षे 18 वरील व्यक्ती जो पर्यंत निवडणूक मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक 6 जमा करत नाही. तोपर्यंत त्यांचे नाव मतदार यादीत येत नाही. त्याचप्रमाणे मतदार कायदा नियम क्रमांक 26 (ब 3) असे सांगतो की जोपर्यंत फॉर्म क्रमांक 7 जमा करत नाही. तोपर्यंत संबंधित व्यक्तीचे नाव वगळता येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या जन्म, मृत्यू विभागाच्या माध्यमातून मृत व्यक्तींचा मृत्यू दाखला दिला जातो. हा दाखला देताना निवडणूक आयोगाचा फॉर्म क्रमांक 7 संबंधी नातेवाईकांनी जमा करावा, असा कायदा अनिवार्य करावा. जमा झालेले फॉर्म निवडणूक आयोगापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था निर्माण करावी, अशी महत्वपूर्ण मागणी कवी यांनी केली आहे.