मुंबई, दि. ६ (पीसीबी) – उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा यांनी टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळे त्यांना हा देखावा करावा लागतोय, असंदेखील त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं. ते अमरावतीत बोलत होते.
हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्व आठवलं, हे त्यांचं दुर्भाग्य आहे, असंही ते म्हणाले.
‘ठाकरेंचं संतुलन बिघडलं’
दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलत होते, त्यावरुन त्यांचं संतुलन पूर्णपणे बिघडलंय, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेत स्पष्ट राग दिसून येत होता, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की आमचा बाप चोरला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार होऊ शकतात. पण विचारधारा ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा विश्वास नवनीत राणा यांनी बोलून दाखवला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार शिंदेकडे होते म्हणूच एवढे लोक एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी आले होते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीत बोलतेवेळी ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेवर निशाणा साधला. दसरा मेळाव्याला झालेल्या दोन सभांपैकी कुणाची सभा सरस ठरली? यावरुन आता राजकीय प्रतिक्रियांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.