तब्बल १० कोटी भरून शिंदे गटाने केले एसटींचे बुकींग ?

0
372

मुंबई,दि.०५(पीसीबी) – दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आले आहे. शिवतिर्थावर ठाकरे गटाचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे दोन्ही गटाकडून प्रयत्न आहे. शिंदे गटाने 3 हजाराहून अधिक एसटीचे बुकींग केले आहे. दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहेत. शिंदे गटाने तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहेत. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे गटाकडून तब्बल 4 हजार एसटी बुक करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार 3000हून अधिक लालपरिंचे बुकींग केले गेले आहे. त्यासाठी शिंदे गटाने तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहेत. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस याबाबत मोजणी सुरु होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दसऱ्याला प्रथमच इतकी मोठी बुकींग करण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे.

शिंदेंच्या दसरा मेळाव्यात कोणताही पक्ष प्रवेश नाही होणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीच्या प्रकरण आणि दोन संशयितांना हैदराबादमध्ये झालेली अटक यामुळे मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. व्यासपीठावर कुणीही नवीन व्यक्ती येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. दरम्यान, नवीन पक्ष प्रवेश दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.