मुंबई, दि. ४ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात मोठी चुरस लागली असून आता शिवसेनेच्या परंपरागत असलेल्या दसरा मेळाव्यावरूनही दोन्ही गटामध्ये चढाओढ लागलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा सालाबादप्रमाणे यंदाही शिवतीर्थावरच होणार असून शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. आता या दोन्ही मेळाव्यास गर्दी जमवण्यासाठी दोन्ही बाजूने मोठी कसरत केली जात आहे. यामध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याला बीकेसी मैदावर ३ लाखांहून जास्त गर्दी जमेल,असा विश्वास शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत केसरकर म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाची जबाबदारी ही पोलीसांची असून तशी तयारी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन होईल. बीकेसीवर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी सुमारे अडीच ते ३ लाखांहून जास्त लोक दसरा मेळाव्यास जमतीलस,असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला आहे.
पुढे केसरकर म्हणाले की, खऱ्या हिंदुत्वाचा जो बाळासाहेबांचा विचार होता. त्या विचाराचं संबोधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. यामुळे असंख्य नागरिक हे एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी येतील, असे मत केसरकरांनी व्यक्त केले.
मेळाव्यामध्ये कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पेलीस प्रशासन घेईल. मात्र, सभत्रेला येणाऱ्यानी बीकेसीच्या मैदानावर लवकर पोहचणं गरजेचं आहे. बीकेसीवरील मेळावा हा विराट असेल. याबरोबरच या मेळाव्यात बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल. राज्यातील जनता ही मुख्यमंत्री शिंदेंकडे आशेने बघत आहे. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकं जमतील, असे केसरकरांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर पहिल्यांदाच हा दसरा मेळावा होणार आहे. यामुळे कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी होते हे बघितलं जाणार आहे. शिंदे गटाकडून यासाठी मोठा जोर लावला जात असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना जमवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामुळे यंदाचे हे दोन दसरा मेळावे कसे असणार याकडे राज्याच लक्षं लागलं आहे. तसेच, या दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी मित्र पक्षांचीही मदत घेतली जात असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे.