रामदास कदम यांचा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी कसा ?

0
324

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : दसरा मेळावा आता अवघ्या काही तासांवर आला आहे. पण मेळाव्याआधीच शिवसेनेच्या गोटातून एक मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना दसरा मेळावाच्या नियोजन बैठकीत वाद विवाद घडून आल्याची बातमी समोर आले आहे. शिवसेना विभाग प्रमुख – पदाधिकारी आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद विवाद घडून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदमांचे पुत्र सिद्धेश कदम, हे अद्यापही युवासेनेचे पदाधिकारी कसे? असा सवाल विभाग प्रमुख आणि नेत्यांनी उपस्थित केला. युवासेनेच वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना हा जाब विचारल्यानंतर, या बैठकीला वादविवादाचे स्वरूप प्राप्त झाले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मुंबईत शिवसेना विभाग प्रमुख, नेते आणि सचिव यांची सोमवारी बैठक झाली. शिवसेनेच्या दसरा मेळावा तयारी आणि नियोजन संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वादविवाद घडून आल्याचे समजते. शिवसेना विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलात पोतनीस आणि इतर काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

रामदास कदम यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना विरूद्ध विधाने करीत आहेत. असे असतानाही त्यांचे पुत्र सिद्धेश कदम हे अद्यापही युवासेनेच्या पदावर कसे राहिले आहेत? अजूनही त्यांची हकालपट्टी का नाही करण्यात आली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.

शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी हा वाद मिटवण्यात पुढाकार घेतला. सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबाही दिला. याउलट वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. त्यामुळे आता सिद्धेश कदम यांच्याबाबत युवासेनेकडून ऍक्शन घेतली जाण्याची शक्यता आहे.