– पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेची लाईव्ह सर्जरी कार्यशाळा संपन्न
पिंपरी, दि. १(पीसीबी) – नवोदित अस्थिरोगतज्ञांना अत्यंत जटिल अस्थिभंगावर (फ्रॅक्चर) शस्त्रक्रिया करताना लाईव्ह कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल. यामुळे चांगल्या प्रकारचे बारकावे समजून घेता येतील आणि पूर्ण उपचाराअंती फलनिष्पत्ती निश्चितच चांगली असेल असे मार्गदर्शन ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॅा. विजय काकतकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटना आणि पिंपरी येथील डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय “लाईव्ह सर्जरी कार्यशाळा” चे (शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ११० पेक्षा जास्त अस्थिरोगतज्ञ सहभागी झाले होते. त्यांना गुंतागुंतीच्या ६ शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा व त्या शस्त्रक्रियांमधील बारकावे अभ्यासण्याची संधी मिळाली.
यावेळी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॅा. विजय काकतकर (नाशिक), डॅा. प्रदिप कोठाडिया (सोलापूर), फुट व ॲंकल तज्ञ डॅा. संपत डुंबरे पाटील (पुणे), डॅा. शाम शिंदे (पिंपरी चिंचवड), डॅा. एस् प्रशांथ (पिंपरी चिंचवड) यांनी स्वतः शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले.
डॅा. डी. वाय. पाटील महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी डॅा. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. जे. एस्. भवळकर, महाविद्यालयाच्या शैक्षणिक संचालिका डॅा. पी. वत्सला स्वामी, पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेचे माजी अध्यक्ष रत्नपारखी, विद्यमान अध्यक्ष डॅा. निर्मल ढुमणे, सचिव डॅा. अभिजीत महादार, पुणे अस्थिरोग संघटनेचे सचिव डॅा. स्वप्नील भिसे तसेच कार्यशाळेचे आयोजक सचिव डॅा. संजय साळवे, डॅा. राहुल साळुंखे व डॅा. हेमंत पाटील आदी उपस्थित होते. अस्थिभंगावरील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपणाची कार्यशाळा पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॅा. निर्मल ढुमणे म्हणाले की, या वर्षीची संघटनेची संकल्पना “इम्प्रूव्ह युवर स्कील” ही आहे. सर्व सभासद व नवोदित तज्ञांसाठी अशाप्रकारच्या विविध कार्यशाळा आयोजित करून त्यांचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
दरम्यान या कार्यशाळेत लोकमान्य रुग्णालयाचे (निगडी) डॅा. आशिष सुर्यवंशी यांनी “कृत्रिम सांध्याभोवतालचे अस्थिभंग” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॅा. राजीव निरवणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॅा. संजय साळवे यांनी आभार मानले.