पिंपरीतील डेअरी फार्म उड्डाणपुलासाठी 59 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध; 10  ऑक्टोबर 2022 पर्यंत भरता येणार निविदा

0
290

पिंपरी दि. १ (पीसीबी) – महापालिकेच्या वतीने पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 59 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.10  ऑक्टोबर 2022 पर्यंत निविदा भरता येणार आहे.

रेल्वे गेट क्रमांक 60 येथील 600 मीटर लांबीचा उड्डाणपूल पुणे-मुंबई जुना महामार्गाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर बांधला जाणार आहे. त्यासाठी संरक्षण विभागाच्या डेअरी फार्मची जागा घेण्यात आली आहे. त्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. महामार्गाकडील रस्ता 12 मीटर आणि पॉवर हाऊस चौकाकडे जाणारा 18 मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. 55 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुलाच्या जोडरस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या कामासाठी एकूण 80 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

या उड्डाणपुलासाठी 18 जून 2021 च्या प्रस्तावानुसार 55 कोटी खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून 58 कोटी 57  लाख 30 हजार 577  रुपये खर्चाची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी दोन वर्षांची मुदत आहे. 10  ऑक्टोबर 2022 पर्यंत निविदा भरता येणार आहे.