महापालिकेने “स्वच्छ सर्वेक्षण 2023” साठी कसली कंबर

0
458

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून “स्वच्छ सर्वेक्षण 2023” साठी कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. विभागनिहाय त्यासाठी जबाबदारी निश्‍चित केली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका पातळीवर आवश्‍यक कामाबाबत कालमर्यादा निश्‍चित केली आहे. 100 टक्के कचरा विलगीकरण, कचऱ्यापासून संपत्ती (वेस्ट टू वेल्थ) या संकल्पनेवर काम आदी बाबींना त्यामध्ये प्राधान्यक्रम दिला आहे. तर “स्वच्छ सर्वेक्षण 2022” च्या निकालाची अद्याप प्रतीक्षा असून पालिकेने मात्र 2023 च्या सर्वेक्षणासाठी कंबर कसली आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण 2022” च्या निकालाची महापालिकेला प्रतीक्षा आहे. हा निकाल ऑक्‍टोंबरमध्ये येणे अपेक्षित आहे. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी शहर स्वच्छतेसाठी मोठे परिश्रम घेतल्याने स्वच्छतेमध्ये शहराचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक येण्याची महापालिकेला आशा आहे. केंद्र सरकारने “स्वच्छ सर्वेक्षण 2023” ची मे महिन्यामध्ये घोषणा केली आहे. या सर्वेक्षणात शहराची रॅंकींग सुधारण्यासाठी महापालिकेने ओला व सुका कचऱ्याचे 100 टक्के विलगीकरण, गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पावर भर दिला आहे.

मोशी येथील 81 एकर क्षेत्रातील कचरा डेपोमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा नुकताच आढावा घेण्यात आला. शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी सोसायटी परिसरात कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प सुरु करायला हवे. त्यासाठी त्यांना नोटीसा बजावलेल्या आहेत. या निकषात बसणाऱ्या 710 सोसायट्यांपैकी सध्या 211 सोसायट्यांनीच कंपोस्ट खत प्रकल्प उभारले आहेत. सोसायट्यांनी खत निर्मिती प्रकल्प उभारून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.

कचरा विलगीकरणाला प्राधान्य
शहरामध्ये ओला व सुका कचऱ्याचे 100 टक्के विलगीकरण व्हावे, असे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. “वेस्ट टू वेल्थ” या संकल्पनेवर भर देताना कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती या प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली. महापालिकेकडून “स्वच्छ सर्वेक्षण 2023” साठी कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. विभागनिहाय त्यासाठी जबाबदारी निश्‍चित केली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका पातळीवर आवश्‍यक कामाबाबत कालमर्यादा निश्‍चित केली आहे. जानेवारी 2023 पर्यंत ही कार्यवाही चालणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण परिणामकारक व्हावे, यासाठी पालिकेचा भर असणार आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण 2023” साठी महापालिकेने आवश्‍यक तयारी सुरु केली आहे. शहर स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. गवळीमाथा झोपडपट्टीत शून्य कचरा झोपडपट्टी या प्रकल्पाला 16 ऑगस्टपासून सुरुवात झाली. पथदर्शी प्रकल्प म्हणून त्याचे नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.