रहाटणी, दि. २७ (पीसीबी) – कंपनीत भागीदारी देण्याच्या बहाण्याने 20 लाख रुपये घेतले. त्या बदल्यात भागीदारी न देता खोटी कागदपत्रे दिली. गुंतवलेल्या रकमेपैकी पाच लाख 70 हजार रुपये परत करत उर्वरित 14 लाख 30 हजार रुपये परत न करता कंपनी विकली. हा प्रकार मे 2014 ते मार्च 2021 या कालावधीत रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी कैलास बाबुराव देशमुख (वय 64, रा. बाणेर) यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद रामदास काळे (रा. वाघोली पुणे. मूळ रा. अहमदनगर), शरद राजाराम म्हस्के आणि त्याची पत्नी (दोघे रा. एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एसटी महामंडळात नोकरी करत होते. त्यावेळी त्यांनी आरोपी शरद काळे याच्या आईज कंपनीत भागीदार होण्यासाठी 20 लाख रुपये दिले. त्याबदल्यात काळे याने फिर्यादी यांना खोटे शेअर सर्टिफिकेट देत कोणतीही भागीदारी दिली नाही. हा प्रकार देशमुख यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गुंतवलेल्या पैशांची मागणी केली. त्यानंतर काळे याने पाच लाख 70 हजार रुपये देऊन उर्वरित 14 लाख 30 हजार रुपये परत न देता काळे याने कंपनी इतर दोन आरोपींना विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.