बनावट कागदपत्रे देउन फायनान्स कंपनीची तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक

0
186

तळेगाव दाभाडे, दि. २३ (पीसीबी) : बँकेत बनावट कागदपत्रे जमा करून खाते उघडून फायनान्स कंपनीचीच चौघांनी तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ६ ऑगस्ट २०२१ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही घटना तळेगाव दाभाडे या ठिकाणी घडली आहे.

रणजीत धर्मराज कोरेकर, संजयकुमार सुरजलाल पटले, व त्यांच्या दोन साथिदारांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित चंद्रकांत साळवे (वय ३१, रा. चिखलसे, कामशेत, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत कोरेकर, संजयकुमार पटले, व त्यांच्या दोन साथिदारांनी खोटे पत्ते, बनावट कागदपत्रे देऊन बँकेचे खाते चालू केले. तसेच कोहीनफाई या कंपनीची बनावट ओळखपत्रे तयार केली. त्यानंतर आरोपींनी आयडीबीआय बँक आणि युनियन बँकेमध्ये तुकाराम शिंदे आणि स्नप्नील पडीले यांच्या नावाने बनावट खाते उघडले.

दरम्यान, या खात्यांद्वारे आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीकडून मोबाईल, होम थिएटर, घरगुती वस्तू, वैयक्तिक कर्ज घेऊन कंपनीची २१ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याबद्दल साळवे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.