मुंबई, दि. २२ (पीसीबी) – वेदांता प्रकल्पावरून युवासेना आक्रमक झाली असून मराठी तरुणांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. तळेगावात 24 सप्टेंबरला युवासेना आक्रोश मोर्चा काढणार आहे.
खोके सरकारने वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठविल्यामुळे, महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात असल्याचे युवासेनेने म्हटले आहे.
युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पत्रक काढण्यात आले आहे. हे पत्रक शिवसेना नेते सूरज चव्हाण यांनी जारी केले आहे. यात म्हटले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्वाखाली माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव – पुणे येथे होण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर, सध्याच्या खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवला गेला. यामुळे महाराष्ट्रातील 1 लाख तरूण बेरोजगार झाले. 1.54 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्राने गमावली.
आता बेरोजगार झालेल्या तरूण-तरुणींनी करायचे काय? तरुणाईच्या हक्काचा रोजगार हे खोके सरकार कसा उपल्बध करून देणार? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आणि हा प्रकल्प परराज्यात गेल्याच्या निषेधार्थ हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प
राज्यात तब्बल साडेतीन लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणू शकणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकार हे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे.