पिंपरी दि. २२ (पीसीबी) – भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांची दुबार नावे कमी होण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात सर्वत्रच मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांमध्ये मोठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे ऐच्छिक असले तरी नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी जास्तीत-जास्त मतदारांच्या निवडणूक ओळखपत्रास आधारकार्डची जोडणी करण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. सध्यस्थितीत अनेक मतदारांची दोन मतदार संघात नावे आहेत. अशी दुबार नावे कमी होण्यासाठी आधारशी ओळखपत्र जोडल्यास एका मतदार संघातील नाव कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. याच उद्देशाने निवडणूक आयोगाच्या वतीने नुकतेच शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात आधार जोडणीसाठी विशेष मोहिम हाती घेतली होती.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदार संघाचा काही भाग येतो. या चारही मतदार संघात 15 लाख मतदारांची संख्या आहे. या चारही मतदार संघात निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिम नागरिकांचा अतिशय अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे. चिंचवडच्या 491 मतदान केंद्रात फक्त 392, पिंपरीच्या 399 मतदान केंद्रांवर 265, भोसरीच्या 418 मतदान केंद्रांवर 402 मतदारांनी निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीसाठीचा फॉर्म भरून दिला आहे.