मुंबई, दि. २१ (पीसीबी) – खोटे जात प्रमाणपत्रामुळे न्यायालयातून अपात्र ठरविण्यात आलेल्या तसेच उध्दव ठाकरे यांच्याविरोधात हनुमान चालिसा साठी आकांडतांडव करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात दरवर्षी कुपोषण आणि बालमृत्यूमुळे किमान २०० ते ३०० बालके मृत्यूच्या दारात ढकलली जातात अशी माहिती समोर आली आहे.कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून जननी-शिशू सुरक्षा योजना, ग्राम बालविकास केंद्रे, जीवनसत्त्वपुरवठा, जंतनाशक मोहीम, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र, भरारी पथक योजना, लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अशा डझनांहून अधिक योजना अस्तित्वात असताना मेळघाटात दरवर्षी सुमारे 200 ते 300 बालके मृत्यूच्या दारात ढकलली जात आहे.
कुपोषण पाचवीला पुजलेल्या मेळघाटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये गेल्या 5 महिन्याच्या काळात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. तर दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण परिस्थीती समोर आली आहे. मागील पाच महिन्यात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवनीत राणायांच्या मतदार संघातील ही घटना असून, विशेष म्हणजे एकट्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात 36 पैकी 19 बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 110 बालकांपैकी शून्य ते सहा महिने या वयोगटातील 77 बालकांचा समावेश आहे. तर 33 बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते. सोबतच दोन गरोदर मातांचा ही यात मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.