पिंपरी महापालिकेने ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा करावा – दिपक खैरनार

0
400

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – येणारा 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना शासन दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार (माहितीचा अधिकार) मिळालेला आहे. त्याचे महत्त्व सकलजणांना पटावे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीनेही 28 सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे की, ‘माहितीचा अधिकार अधिनियम-2005’ हा कायदा देशभरात लागु झाल्यापासुन देशातील व राज्यातील भ्रष्टाचाराला मोठया प्रमाणावर अंकुश बसत आहे. शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली. परंतु या कायद्याचा प्रचार व प्रसार व्यापक स्वरूपात होण्याची नितांत गरज आहे.

प्रशासनाने वेळोवेळी उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे अल्पावधीतच हा कायदा देशात व राज्यात लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा,यासाठी महाराष्ट्र शासनाने यापुर्वीही आदेश दिलेले आहेत. दरवर्षी शासकीय पातळीवर आदेश निघतो; पण माहिती अधिकार दिन केवळ कागदोपत्री साजरा होत असून, त्याची जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.

या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देवून व विविध उपक्रम राबवून, त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यात याव्यात. या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला ” माहितीचा अधिकार ” या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून ” माहिती अधिकार दिवस ” म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती, प्रचार-प्रसार करून नागरिकांपर्यंत पोचविण्या हेतू शासनाने निर्णय घेतला आहे.त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणीही खैरनार यांनी केली आहे.