तडीपार आरोपीला गांजा बाळगल्या प्रकरणी अटक

0
426

वाकड, दि. १८(पीसीबी) – तडीपार आरोपी परवानगी शिवाय शहराच्या हद्दीत आला. त्याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी म्हातोबानगर, वाकड येथे घडली.

पोलीस नाईक संदीप पाटील असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रकाश घाडगे (वय 24, रा. म्हातोबानगर, वाकड), सागर प्रकाश घाडगे (वय 27, रा. म्हातोबानगर, वाकड), अशोक तुपेरे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी रवींद्र घाडगे याला एक जुलै 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने गांजा बाळगला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून 20 हजार 250 रुपये किमतीचा 810 ग्रॅम गांजा, 1700 रुपये रोख रक्कम, 20 हजारांचा मोबाईल फोन असा 41 हजार 950 रुपयांचा ऐवज आढळला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने हा गांजा अशोक तुपेरे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपी सागर याने पोलिसांच्या अंगावर धावून जात पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला. कुत्र्याने चावा घेतल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.