मोदींचे २५ महत्त्वाचे निर्णय

0
218

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. भाजप नेते आणि मोदी समर्थक आज मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे काही धडाकेबाज निर्णय घेतले त्या निर्णयांची जोरदार चर्चा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू आहे. मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे देशात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.आज आम्ही तुम्हाला मोदींच्या अशा २५ निर्णयांबद्दल सांगणार आहोत. ज्या निर्णयाची केवळ देशानेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नोंद घेण्यात आली.या निर्णयामध्ये कलम ३७० हटवण्यापासून ते बालाकोट एअर स्ट्राइकपर्यंतच्या निर्णयांचा समावेश आहे.चला तर जाणून घेऊयात पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल

मोदींचे २५ महत्त्वाचे निर्णय
१) कलम ३७० – दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवण्यात आल्याची घोषणा केली. याचबरोबर काश्मीरचे विशेष अधिकार देखील संपुष्टात आले. कलम ३७० हा भाजपाच्या जाहीरनाम्यामधील मुख्य विषय होता. ५ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले आश्वासन पूर्ण केले.
२) इंडिया गेट – इंडिया गेटवर असलेल्या अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये करण्यात आले.
३) अर्थसंकल्पाची तारीख – देशात भाजपाचे सरकार सत्तेत येताच अर्थसंकल्पाची तारीख देखील बदलण्यात आली. मोदी सरकार येण्यापूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला सादर होत होता. मात्र ती तारीख बदलण्यात आली. आता अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येतो.
४) सीएए, एआरसी- मोदींनी आपल्या कार्यकाळात घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. 10 जानेवारी 2020 रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याद्वारे शेजारच्या देशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
५) आंतरराष्ट्रीय योग दिवस – पंतप्रधान मोदींनी योगाला अंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळून दिली. मोदींच्या प्रयत्नामुळे 21 जून 2015 पासून 21 जून हा जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
६) जलशक्ती मंत्रालय- पंतप्रधान मोदींनी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली. जलसंपदा, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे विलीनीकरण करून जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
७) बालाकोट एअर स्ट्राइक – पुलवामामध्ये भारतीय सैनिकांवर हल्ला झाला होता, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकचा निर्णय घेतला. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय सेनेने बालाकोट एअर स्ट्राइक घडवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
८) नोटबंदी – नोटबंदी हा पंतप्रधान मोदींचा एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीनंतर चलनात असलेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बाद करण्यात आल्या.
९) सरकारी बँकांचे विलिनिकरण – मोदी सरकारने 1 एप्रिल 2020 रोजी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. ज्या अतंर्गत दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण 4 मोठ्या सरकारी बँकांत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१०) लॉकडाऊन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याला अटकाव घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.या निर्णयाकडे त्या काळातली एक महत्त्वाची गरज म्हणून पाहिलं जातं.
११) दिल्लीच्या रेस कोर्स रोडचे नाव – दिल्लीच्या रेस कोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग असे करण्यात आले.
१२) अपंग शद्बाचे नामकरण – अपंग या शद्वाऐवजी दिव्यांग असा शद्ब वापरण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक झाले.
१३) सेंट्रल व्हिस्टा : सेंट्रल व्हिस्टा हा मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातंर्गत 20,000 कोटी रुपये खर्च करून, संसदेच्या नव्या इमरातीची उभारणी करण्यात आली आहे.
१४) सर्जिकल स्ट्राईक – पंतप्रधान मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला.भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले.
१५) राजपथ झाले कर्तव्यपथ – केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलू कर्तव्यपथ असे केले.
१६) किसान सन्मान निधी योजना – मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू केली. ज्या अतंर्गत ज्यांच्या नावावर जमीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना केंद्रामार्फत दरवर्षी 6,000 हजार रुपयांची मदत मिळते.
१७) नीति आयोग – मोदी सरकारने 1 जानेवारी 2015 ला नियोजन आयोगाचे नामकरण ‘NITI’ आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे केले.
१८) जीएसटी – मोदी सरकारने राज्याच्या करप्रणालीत सुधारणा करत एक देश एक कर पद्धत अर्थात जीएसटी लागू केली. जीएसटीचे विभाजन केंद्र 50 टक्के आणि राज्य 50 टक्के असे करण्यात आले आहे.
१९) राम मंदिर – राम मंदिराचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र त्यावर तोडगा काढण्यास केंद्रातील मोदी सरकारला यश आले.
२०) वन नेशन, वन रेशन कार्ड – जे रेशन कार्डधारक आहेत. त्यांना देशात कुठेही स्वस्त धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून वन नेशन, वन रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली.
२१) नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण: अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण केले आहे.
२२) तीन तलाक कायदा – हा देखील भाजप सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. या कायद्याने मुस्लीम महिलांना न्याय मिळून देण्याचे काम केले.
२३) वॉर मेमोरियल:शहीद सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वॉर मेमोरियल उभारण्यात आले आहे.तिथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहिण्यात आली आहेत.
२४) इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचा निर्णय – मोदी सरकारच्या काळात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
२५) एकही सुट्टी न घेता काम करण्याचा विक्रम – पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता काम करण्याचा विक्रम प्रस्थापीत केला आहे.