महापालिकेच्या ‘हाय वैक्युम सक्षन’ मशीन खरेदीत घोटाळा; अधिकाऱ्याची चौकशी करा – लक्ष्मण जगताप

0
200

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदीत गडबड घोटाळा झाला आहे. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, “महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयांसाठी 20 हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानंतर मे. सेबर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादार ठेकेदाराला कामाचा आदेश दिला आहे. त्यानुसार संबंधित पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन पुरवल्या आहेत. मुळात या मशीन खरेदीची निविदाच म्हणजे एक प्रकारचा गडबड घोटाळा आहे. निविदा प्रक्रियेमध्ये निश्चित केलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून या पुरवठादार ठेकेदाराला पात्र केले आहे.

निविदेत मशीनमध्ये कोणत्या टेक्निकल स्पेशिफिकेशन असावेत हे नमूद आहे. त्यानुसार पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला मशीन देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीन निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशनच्या नसल्याचे समोर आले आहे. घोटाळा करण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया राबवलेल्या अधिकाऱ्यांनी निविदेत नमूद टेक्निकल स्पेशिफिकेशन नसलेल्या मशीन पुरवठादार ठेकेदाराकडून दाखल करून घेतल्या आहेत. निविदेत एका मशीनची किंमत सुमारे 6 लाख 80 हजार नमूद असून, सरकारच्या जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत 3 ते 4 लाखांच्या घरात आहे. पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल 14 हून अधिक टेक्निकल स्पेशिफिकेशन नसल्याची बाब समोर आली आहे. मशीनमध्ये चुकीचे ऑपरेटिंग सिस्टिम, चुकीचा एअर फ्लो, व्हायरस फिल्टर नसणे, उच्चतम आवाज पातळी, मशीनमध्ये मेंब्रेन प्रणाली नसणे, इलेक्ट्रिक शॉक न लागण्याची प्रणाली नसणे, सॉलीडीफायडर नसणे यांसह अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. या मशीन वापरात आणल्यास उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्या मशीन हाताळणाऱ्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व जिवाला धोका होऊन मोठी दुर्घटना नाकारता येत नाही.