पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर! सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग

0
269

– मुळशी धरणाचा विसर्ग आता ३५ हजार क्युसेक्सवर

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मागील चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वारसगाव, मुळशी व पवना धरणे फुल्ल भरली आहेत. त्यामुळे सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.

मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सकाळी 12 वाजल्यापासून विसर्ग 15 हजार 840 क्युसेकवरुन विसर्ग 21 हजार 120 करण्यात आला. आज दू. २ः०० वा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग २१,१२० वरून वाढवून २६,४०० क्युसेक्स करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून ३०,००० ते ३५००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे बसवराज मुन्नोळी यांनी कळविले आहे. तर, पवना धरणाच्या परिसरातही पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून विसर्गात वाढ केली जाणार आहे. 4 हजार 200 क्युसेकने वाढ केली आहे. धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 तर सांडव्यातून 6 हजार 400 असे 7 हजार 800 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व येणारा येवा यांचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल.

चासकमान धरणही 100 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दुपारी 12 वाजल्यापासून सांडव्याद्वारे 9 हजार 375 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल केला जाणार आहे. खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये सुरू असणारा 19 हजार 289 क्युसेक्स विसर्गात वाढ केली आहे.

दुपारी 12 वाजल्यापासून 22 हजार 880 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार वरसगाव व खडकवासला धरणाच्या विसर्गामध्ये बदल संभवू शकतो. पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2604 क्यूसेक विसर्ग वाढविला आहे. सांडव्याद्वरे 3908 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 650 क्युसेक असा एकूण 4558 क्युसेक करण्यात येत आहे. खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणातून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.

नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणी उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाठबंधारे विभागाने केले आहे.