“जेआरडी टाटा पुरस्कार ही जीवनाची कृतार्थता!” – डॉ. पी. डी. पाटील

0
248

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) “कोणत्याही उद्योजकाला जेआरडी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार प्राप्त होणे ही त्याच्या जीवनाची कृतार्थता होय!” असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील सुमारे आठ उद्योजकांना सन्मानित करण्यात आले.

टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलचे उपाध्यक्ष सूर्यकांत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी स्वागत केले. पुरस्कारार्थींमध्ये प्रगती प्रेस टूल्सचे संचालक लक्ष्मण काळे (उद्योगरत्न), बांधकाम व्यावसायिक आणि कृषी उद्योजक सुदाम मोरे (उद्योगविभूषण), मृदुला बायोटेक रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. अशोक शिंदे (उद्योगभूषण), व्हीपीके उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कवळे (युवाउद्योजक), यंत्रशिल्पा टेक. प्रा. लिमिटेडचे संचालक अविनाश गावंडे (उद्योगविकास), प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा जगताप (कृषिउद्योग), पाणेरी ब्युटी ॲण्ड स्पा इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिल्पा जगदाळे आणि महिला आरोग्य व स्वयंरोजगार समन्वयक उज्ज्वलाराजे निंबाळकर-ढमढेरे (उद्योगसखी) यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते. याप्रसंगी सूर्यकांत मुळे यांनी, “बेरोजगारीच्या प्रश्नावर काम देणारी माणसे जास्त प्रमाणात निर्माण झाली पाहिजेत!” असे मत व्यक्त केले. डॉ. पी. डी. पाटील पुढे म्हणाले की, “दूरदृष्टी लाभलेले जेआरडी टाटा हे सर्वगुणसंपन्न होते. गरिबी ही चटका लावणारी गोष्ट असली तरी त्यातूनही प्रेरणा घेऊन स्वतः बरोबरच समाजाची प्रगती साध्य करणाऱ्या व्यक्तींची देशाला नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर महिला उद्योजिकांची वाढती संख्या दिलासादायक आहे!” मनोहर पारळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची अचूक निवड करून त्यांचा उचित सन्मान करणे हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे कार्य अतिशय स्तुत्य आहे. गरजू हातांना काम उपलब्ध करून देणे ही समाजसेवा आहे!” असे विचार मांडले. प्रगतिशील महिला शेतकरी मनीषा जगताप यांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले; तर परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी मार्मिक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुरस्कारार्थींची प्रेरणा, उद्योगक्षेत्रातील वाटचाल, भावी उद्दिष्ट्ये आणि पुरस्काराविषयी भावना जाणून घेतल्या. कवयित्री संगीता झिंजुरके यांनी सुरेल आवाजात ‘संवाद’ ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुरलीधर साठे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, जयवंत भोसले, दीपक चांदणे, इंद्रजित पाटोळे, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.