भाजपाच्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय कडे

0
298

पणजी, दि. १२ (पीसीबी) : भाजपच्या हरियाणातील नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाट हिच्या मृत्यूची चौकशी अखेर सीबीआय करणार आहे. या प्रकरणाची सीबीआयची चौकशी करण्याची मागणी वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अखेर हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनालीच्या मृत्यूचं गूढ वाढत चालल्याने खाप पंचायत बोलवण्यात आली होती. खाप पंचायतीनेही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी खाप पंचायतीने राज्य सरकारला डेडलाईनही दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने अखेर ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सीबीआयकडून तपासलं जाणार असून सोनालीच्या मृत्यूचा छडा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्व जातीय खाप पंचायतने भाजप आणि गोवा सरकारला सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. 23 सप्टेंबरपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा अल्टिमेटम खाप पंचायतने राज्य सरकारला दिला होता. त्या आधीच राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. हिसारच्या जाट धर्मशाळेत रविवारी ही महापंचायत पार पडली होती. सोनाली फोगाटची मुलगी यशोधरा आणि तिच्या कुटुंबीयांनीही या महापंचायतमध्ये भाग घेतला होता.

सोनाली फोगाट हत्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमचे पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. गोवा पोलिसांकडून चांगले संकेत मिळत आहेत. मात्र, सोनालीच्या मुलीने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं.
ऑगस्टच्या अखेरीस सोनाली फोगाटचा गोव्यात मृत्यू झाला होता. गोव्यात आल्यानंतर अवघ्या काही तासात सोनालीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनालीचा पीए सांगवानसहीत एका व्यक्तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने सुरू असल्याने महापंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. आता 24 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत संपूर्ण हरियाणा आणि इतर राज्यातील खास प्रतिनिधी या बैठकीत सामील होणार आहेत.