मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा? प्रशासनाने काढले अजबच पत्र

0
386

मुंबई दि. ११ (पीसीबी_- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याचे सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय सभेला गर्दी जमवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यात येत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुद्धा मोठी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्राने मोठा गोंधळ उडाला आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना उपस्थित राहण्याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी दिसावी म्हणूनच हे पत्र काढण्यात आल्याचा आरोप आता विरोधक करू लागले आहेत.

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री यांची 12 सप्टेंबर रोजी पैठण मतदारसंघात सभा आयोजित केली असून,आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावतील अंगणवाड्या सेविका / मदतनीस यांनी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहणे बाबत गटविकास अधिकारी यांच्या सूचना आहेत. तरी सदर कार्यक्रमास कावसानकर स्टेडियम, पैठण येथे ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आधी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संदिपान भुमरे पहिल्यांदाच पैठणमध्ये आले असता त्यांच्या कार्यक्रमाकडे नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने खुर्च्या खाली होत्या. त्यामुळे अशीच परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या सभेत होऊ नये, म्हणून गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे.