पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – सहाय्यक पोलीस फौजदार असल्याचे सांगून नोकरीवर असताना जेलमध्ये एक आरोपी आपल्या हातून मेल्याने आपल्याला निलंबित केले असल्याचे सांगत एकाने घर मालक तरुणाला वारंवार मारहाण करत दमदाटी केली. हा प्रकार जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत नक्षत्र पीजी नारायण नगर हिंजवडी येथे घडला.
साजिद मन्सूर पेंढारी (वय 23, रा. नक्षत्र पीजी, नारायण नगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल नामदेव राठोड (वय 29, रा. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नारायण नगर, हिंजवडी येथे एकविरा पीजी चालवितात. तिथे राहत असलेला मुलगा विकी चव्हाण याची फिर्यादी सोबत ओळख झाली. विकी याने फिर्यादी यांना त्याचा मामा आरोपी राहुल राठोड याच्यासोबत ओळख करून दिली. जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी, मी पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार पदावर नोकरी करत होतो. मी पोलीस स्टेशन हाऊस इन्चार्ज होतो. आमच्या ताब्यात एक आरोपी होता. तो लॉकअप मध्ये असताना मेला. माझ्यावर डेथ इन कस्टडी झाली. मला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले. त्यामुळे मी हिंजवडी येथे नोकरीसाठी आलो आहे, असे वारंवार भासवून विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मोबाईल फोनवर फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांची पिंजऱ्याची गाडी बोलावतो. तुला जेलमध्ये टाकतो, असे बोलून पोलिसांची भीती दाखवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.