पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा कमळ फुलवण्यासाठी बावनकुळे आणि आमदार जगताप यांच्यात चर्चा

0
432

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. ७) आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी आमदार जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत आमदार जगताप आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यासोबत चर्चा केली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवण्यासाठी बावनकुळे आणि जगताप बंधू यांच्यात राजकीय रणनिती ठरल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून भाजपचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून आणणारच, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार जगताप हे लवकरच ॲक्शन मोडमध्ये येणार असल्याचे सांगितले.

विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. ते बुधवारी ७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये होते. त्यांनी सर्वात आधी आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बावनकुळे यांनी आमदार जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप व त्यांच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार जगताप यांची तब्येत आता ठणठणीत झाल्यामुळे बावनकुळे यांनी देवाचे आभार मानले. भाजपाचे पुणे शहर पदाधिकारी संदीप खर्डेकर यांच्यासह माजी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, युवा मोर्चाचे अनुप मोरे, मोरेश्व शेडगे, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

आजारपणामुळे डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिलेला असतानाही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईपर्यंत एम्ब्युलन्सने प्रवास करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरून मतदान केल्याबद्दल बावनकुळे यांनी आमदार जगताप यांचे विशेष आभार मानले. “पक्षनिष्ठेचा दुसरा चेहरा म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप”, अशा शब्दांत बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षनिष्ठेला यावेळी सलाम केला.

आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील भाजपचे हुकमी एक्का आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकण्याचा राजकीय चमत्कार घडवला होता. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत बावनकुळे यांनी आमदार जगताप व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी चर्चा केली. शहरातील सध्याच्या राजकीय परिस्थिती बावनकुळे यांनी जाणून घेतली.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि जगताप बंधू यांच्यात पिंपरी-चिंचवड महापालिका दुसऱ्यांदा जिंकण्याची रणनिती ठरल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांच्या साथीने १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू, असा विश्वास आमदार जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिला आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनीही महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ देत, आम्ही पुन्हा महापालिका जिंकण्यासाठी सज्ज असून, सर्व राजकीय तयारी झाल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील जनताही पुन्हा पाच वर्षे सेवा करण्याची भाजपला संधी देण्याच्या मानसिकतेत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार लक्ष्मण जगताप हे पुन्हा लवकरच ॲक्शन मोडमध्ये येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी येणार असल्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते. बावनकुळे यांनी प्रत्येकाची भेट घेत आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये उत्साह संचारला असून, आगामी काळात महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आणखी जोरदार मोर्चेबांधणी केली जाणार असल्याचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले.