विमानतळांवर खासगी सुरक्षा रक्षक होणार तैनात; सीआयएसएफने 3 हजारांहून अधिक पदे संपुष्टात आणली

0
313

देश,दि.०७(पीसीबी) – भारतातील विमानतळांच्या सुरक्षाव्यवस्थेत सरकारने मोठा बदल केला आहे. नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत सीआयएसएफने 3 हजारांहून अधिक पदे संपुष्टात आणली आहेत. देखरेख अन् सुरक्षेसाठी स्मार्ट तंत्रज्ञान उपकरणांच्या मदतीने खासगी सुरक्षा रक्षकांकडून मुख्य सुरक्षाकार्य वगळून उर्वरित कामे केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण अन् गृह मंत्रालयाकडून संयुक्तपणे 2018-19 मध्ये यासंबंधीची कार्ययोजना तयार करण्यात आली होती. नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) स्वतःच्या क्षेत्रीय कार्यालयांसह देशातील 50 विमानतळांवर ही नवी व्यवस्था लागू करणार आहे.

बीसीएएसकडून तयार करण्यात आलेल्या योजनेमुळे एकूण 3,049 पदे संपुष्टात येणार आहेत. त्यांची जागा 1,924 खासगी सुरक्षा रक्षक घेणार आहेत. याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅगेज स्कॅनर यासारख्या स्मार्ट देखरेख तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. खासगी सुरक्षा रक्षकांना दिल्ली, मुंबई आणि अन्य विमानतळांवर बिगर-संवेदशनील कामांसाठी तैनात केले जाणार आहे. यात रांगेचे व्यवस्थापन, एअरलाइन्सच्या कर्मचारी आणि प्रवाशांना सुरक्षा सहाय्य, टर्मिनलमध्ये एंट्री तसेच एक्झिट पॉइंटवर काम करणे सामील अससणार आहे. प्रवेशावेळी प्रवाशांच्या माहितीची पडताळणी, प्रवाशांची तपासणी, सेकेंडरी लॅडर पॉइंट चेकिंग आणि दहशतवादविरोधी सुरक्षा प्रदान करण्याचे मुख्य कार्य सीआयएसएफ सुरू ठेवणार आहे.

सद्यकाळात 65 विमानतळांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे 33,000 एएसजी जवान तैनात आहेत. यातील 3,049 पदे समाप्त करण्यात आली असून त्याठिकाणी 1,924 पदांवर खासगी सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात येणार असल्याचे सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. विमानतळांवर आता स्मार्ट सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बिगर-संवेदनशील कामांसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात केले जातील अशी माहिती नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोचे संयुक्त महासंचालक जयदीप प्रसाद यांनी दिली आहे.