सांगवी, दि. ३ (पीसीबी) – कमी किमतीत सदनिका खरेदी करून देतो, असे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर येथे घडला.
संतोष कोंडीबा शिंदे (वय ४३, रा. रहाटणी), दिनेश दत्तात्रय पाटील (वय ५७, रा. पिंपळे सौदागर), संदीप परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना कमी किमतीत नवीन सदनिका खरेदी करण्यासाठी मदत करतो असे सांगून त्यांना आरोपींनी नेले. कमी किमतीत सदनिका खरेदी करून दिली आहे, असे सांगून फिर्यादी यांच्या नावावर कर्ज मिळत नसल्याचे संतोष शिंदे याने सांगितले. त्याने स्वतःच्या नावावर कर्ज काढून ते पैसे बांधकाम व्यावसायिकाला दिले आहेत असे भासवून फिर्यादीकडून १६ लाख ६६ हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानंतर रोख स्वरूपात आठ लाख ४० हजार रुपये घेतले. एकूण २५ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.