शरद पवार आणि नीतीश कुमार भेटणार

0
203

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची रणनीती काय असावी, यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यावेळी नीतीश कुमार हे पवारांची भेट घेणार आहेत. नीतीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडले आहेत. त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी या बैठकीत काय रणनीती ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी ८ सप्टेंबर रोजी नीतीश कुमार यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शरद पवार यांची दिल्ली आणि मुंबईत येऊनही भेट घेतली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हेही पवारांना मुंबईत भेटले होते. त्यानंतर नीतीश कुमार हे पवारांना भेटत आहेत.

दरम्यान, नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. भाजपसोबतची सत्ता सोडून नीतीशकुमार यांनी कट्टर विरोधक लालू यादव यांच्या पक्षाशी संधान साधले आहे. त्यानंतर नीतीशकुमार यांनी चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आता नीतीश हे पवारांना भेटणार आहेत, त्यातून त्यांनी विरोधी आघाडीत मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.