कमळाला हिणवायला बाई म्हणता, उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?

0
323

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर केलेल्या टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘सामना’तून भाजपचा उल्लेख कमळाबाई असा केला आहे. झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे, असे ‘सामना’मध्ये म्हटले आहे. यावरुनच भाजप- शिवसेनेत जुंपली आहे.

शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आशिष शेलार यांनी पत्र लिहले आहे. शेलारांनी हे पत्र टि्वट केले आहे. ‘कमळाबाई’ या उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता. मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. एका भाषणात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हीचे लक्ष दुसर्‍या पक्षाकडे असते,” इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजप-शिवसेनेने एकमेकांची साथ सोडली. तेव्हा’कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या’, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेला “पेग्विन सेना ” म्हणणारे आशिष शेलार यांच्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे लवकरच समजेल.
भाजपवर आजही शिवसेनेने टीका केली आहे. ‘केंद्र सरकार बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा वेगाने धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाच्या औद्योगिक उत्पादनात कशी झपाटय़ाने वाढ होते आहे, याचे ढोल बडवणारे आकडे जाहीर करणारे सरकार बेरोजगारीच्या भयावह संकटाविषयी काहीच का बोलत नाही?, असा सवाल ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.