निर्माते रवींद्र चंद्रशेखरन आणि अभिनेत्री महालक्ष्मी अडकले विवाहबंधनात

PCB Admin
2 Min Read

चैन्नई,दि.०३(पीसीबी) – टॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत लग्नाचा बार उडवून देण्याची धांदल सुरू आहे. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्याचे जोडीदार निवडले आणि त्यांच्यासोबत लग्नं केलं. चेन्नईमध्ये नुकतीच टॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोडी बोहल्यावर चढली असून त्यांचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ही जोडी आहे तमिळ सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक रवींद्र चंद्रशेखरन आणि अभिनेत्री महालक्ष्मी यांची. नुकताच या दोघांनी विवाह केला असून त्यांचे फोटो पाहून चाहते म्हणाले, जोडी खूपच छान आहे.

गुरूवारी १ सप्टेंबरच्या मुहूर्तावर चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांनी एकमेकांसोबत सप्तपदी चालली. मोजके नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या साक्षीने चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली. यावेळी महालक्ष्मी आणि चंद्रशेखरन यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या ब्लाउजमध्ये महालक्ष्मी अतिशय सुंदर दिसत होती. चंद्रशेखरन यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी परिधान केली होती. चंद्रशेखरन यांच्या हातात हात घालून उभी असलेल्या महालक्ष्मीच्या फोटोंना चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

महालक्ष्मीने तिच्या सोशल मीडिया पेजवर लग्नाचे फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत. या फोटोसोबत महालक्ष्मीने चंद्रशेखरन यांच्यासाठी खास मेसेज लिहिला आहे. महालक्ष्मी असं म्हणत आहे की , मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात तुम्ही आला. तुम्ही तुमच्या प्रेमाने माझ्या आयुष्यात रंग भरले आहेत. यावर काही नेटकऱ्यांनी असं म्हटलं आहे की महालक्ष्मी जणू चंद्राचा तुकडाच दिसत आहे. चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांची जोडी खूपच एकरूप दिसत आहे असंही काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

रवींद्र चंद्रशेखरन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. तमिळ सिनेमांमध्ये ते गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. २०१३ साली चंद्रशेखरन यांनी त्यांची लिब्रा प्रॉडक्शन हाऊस ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेतर्फे त्यांनी सुत्ता कथई यासारखे अनेक हिट सिनेमे बनवले. महालक्ष्मीच्या कामाबद्दल सांगायचे तर, तिने तिचं करिअर सन म्युझिक चॅनेलवर व्हिडिओ जॉकी म्हणून सुरू केलं. त्यानंतर तिला काही अभिनयाच्या ऑफर आल्या. अभिनयातही तिने बाजी मारली. अनेक मालिकांमध्ये महालक्ष्मीने काम केलं. तिच्या मालिका आणि सिनेमा हिट ठरल्या.

Share This Article