अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू अटकेत

0
157

बेंगळुरू, दि. २ (पीसीबी) – कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. संपूर्ण प्रकरणात विहित प्रक्रियेचं पालन केलं जाईल. वैद्यकीय चाचणी व तपासणी प्रक्रिया नियमानुसार होईल. त्यानंतर शिवमूर्ती यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे एडीजीपी आलोक कुमार यांनी दिलीय. दरम्यान, आज या प्रकरणी दुसरी आरोपी अक्कमहादेवी रश्मी हिला अटक करण्यात आलीय. ती मठाची कर्मचारी आहे.

पोलिसांनी महंत आणि इतर चार जणांविरुद्ध पोक्सो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आलीय. शरनारू हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मुरुगा शरनारू यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, गुरुवारी चित्रदुर्गाच्या न्यायालयानं सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. यापूर्वीही त्यांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी शिवमूर्तींसह वसतिगृह प्रमुख परशिवैय्या बसवदित्य, मठ कर्मचारी अक्कमहादेवी रश्मी आणि वकील गंगाधरैया यांच्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.