पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, बुधवारपासून सुरू झाली. करोना संकटाच्या दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात आणि उत्साहाने उत्सव साजरा होणार असल्याने पुणे, मुंबईसह राज्यभरातील भक्त गणरंगात न्हाऊन निघाले आहेत. खरेदी, सजावट, नैवेद्य, फुलांच्या खरेदीदारांनी बाजारपेठा फुलल्या होत्या. तर सार्वजनिक मंडळांमध्येही गणरायाच्या आगमनापूर्वीच दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. पुणे शहरातील मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळांनी विधीवत श्रीगणेशाचे स्वागत केले आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली. पिंपरी चिंचवड शहरात मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी गर्दी कायम असून मानाच्या गांधीपेठ तालिम मित्र मंडळाच्या बाप्पांची प्रतिष्ठापना सकाळी करण्यात आली.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात सुमारे तीन हजारावर सार्वजनिक मंडळांनी यावेळी सजावट केली आहे. भोसरी, चऱ्होली, चिखली, मोशी, तळवडे, देहूरोड, मामुर्डी, रावेत, पुनावळे, वाकड, काळेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी या भागात गेल्या दोन वर्षांपेक्षा मोठा उत्साह दिसून आला. देखाव्यांतून समाजप्रबोधनाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सोमवारपासूनच भाविकांना रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा लालबाग, परळसह खेतवाडीतील गणेशोत्सवात गर्दीचा नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता मंडळांकडून वर्तवण्यात येत आहे. भाविकांना गणरायाचे दर्शन घडावे आणि गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी मंडळांकडून नियोजनावर भर देण्यात येत आहे.
ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये मंगळवारपासूनच ठाणे जिल्ह्यातील सुमारे दीड लाख गणपतींचे घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रविवारपासूनच मंडपामध्ये गणराय विराजमान झाले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १ लाख ४० हजार ३६६ खासगी आणि १ हजार ५२ सार्वजनिक गणेशांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई अशा सगळ्याच शहरामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.