उस्मानाबाद, दि. ३० (पीसीबी) – आधी शिष्याने शिंदे गटात प्रवेश केला नंतर गुरुला शिष्याने प्रवेश दिला अशीच घटना आज घडली आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहणार, असे म्हणणारे उस्मानाबाद जिल्हयाचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मध्यस्थी केली आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा योग्य सन्मान करु असे आश्वासन दिले. या वेळी बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.
विधानपरिषदेवर संधी मिळण्याच्या चर्चा
माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी विधान परिषद डोळयासमोर ठेवुन प्रवेश केल्याचे चर्चेत सांगितल जातय. चिरंजीव किरण गायकवाड यांची वर्णी लागते कि प्रा. रविंद्र गायकवाड यांची वर्णी लागते ते भविष्यात दिसेल. या प्रवेशामुळे उमरगा मतदार संघात शिवसेनेला नव्या नेतृत्वाला संधी दयावी लागेल कमकुवत झालेल्या शिवसेनेने नव्या उमेदवारास बळ दयावे लागेल.राजकीय गुरु प्रा. रविंद्र गायकवाड मार्गदर्शनाखाली ज्ञानराज चौगुले शिंदे गटात गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. रविंद्र गायकवाड यांनी ज्ञानराज चौगुलेंच्या शिंदे गटातील प्रवेशाचं वृत्त फेटाळत प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. मात्र, आज रविंद्र गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं त्यावेळची बातमी खरी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्रा. रविंद्र गायकवाड यांचे घर हे वारकरी सांप्रदायातले हा वारसा रविंद्र गायकवाड यांनी पुढे नेला भजन, किर्तन या माध्यमातून वारकरी सांप्रदाय जोपासला. रविंद्र गायकवाड यांचे घर काँग्रेसचे एकनिष्ठ होते वडिल १९७२ मध्ये उमरगा पंचायत समितीचे सभापती होते तर आई उमरगा नगरपरिषदेत नगर सेवक होत्या. १९८५ मध्ये रविंद्र गायकवाड हे उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविदयालयात प्राध्यापक म्हणुन रुजू झाले उत्कृष्ट वक्ता असल्यामुळे मराठवाडयात शिव जयंती निमित्त भाषणे करत. अध्यात्मावर असलेली पकड आणि उत्कृष्ट वकृत्वामुळे रविंद्र गायकवाड नावारुपास आले होते तसेच महाविदयालातील विदयार्थीना मदत करत असल्यामुळे उमरगा तालुक्यात चर्चेत आले.
१९८५-८६ मध्ये शिवसेनेने मराठवाडयात पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि ८०% समाजकारण २०% राजकारण याचा प्रभाव रविंद्र गायकवाड यांच्यावर झाला यामुळे रविंद्र गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला परंतु घरातुन या निर्णयाला विरोध झाला तरी सुध्दा रविंद्र गायकवाड यांनी शिवसेना सोडली नाही. १९८६-८७ साली रविंद्र गायकवाड उपजिल्हा प्रमुख झाले.










































