महापालिका उद्यान विभाग, अतिक्रमणासाठी वाहने भाडेतत्वार घेणार

0
214

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान आणि अतिक्रमण विभागासाठी जीप, टेम्पो तसेच ट्रक अशी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. दीड वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या या वाहनांच्या भाड्यापोटी चार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

महापालिका वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाच्या वतीने उद्यान आणि अतिक्रमण विभागाच्या वापरासाठी आवश्यकतेप्रमाणे वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी दोन निविदाधारक अपात्र ठरले. उर्वरित तीन निविदाधारकांपैकी बालाजी गॅरेज यांनी लघुत्तम दर सादर केला. त्यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप किंवा तत्सम वाहनांसाठी 12 तास 80 किलोमीटर प्रतिदिन वापराकरिता 2280 रुपये दर सादर केला आहे.

80 किलोमीटर पुढील प्रत्येक किलोमीटर धावेसाठी 14 रुपये 50 पैसे दर दिला आहे. तसेच 12 तासांवरील प्रतीक्षा करापोटी प्रतितास 140 रुपये असा दर सादर केला आहे. चारचाकी टेम्पोसाठी (407/ 410) 12 तास 80 किलोमीटर प्रतिदिन वापराकरिता 2280 रुपये दर सादर केला आहे. 80 किलोमीटर पुढील प्रत्येक किलोमीटर धावेसाठी 18 रुपये दर दिला आहे. तसेच 12 तासांवरील प्रतीक्षा करापोटी प्रतितास 180 रुपये असा दर सादर केला आहे.

ट्रक आणि तत्सम वाहनांसाठी 12 तास 80 किलोमीटर प्रतिदिन वापराकरिता 2480 रुपये दर सादर केला आहे. 80 किलोमीटर पुढील प्रत्येक किलोमीटर धावेसाठी 20 रुपये दर दिला आहे. तसेच 12 तासांवरील प्रतीक्षा करापोटी प्रतितास 180 रुपये असा दर सादर केला आहे. त्यांचे दर लघुत्तम असल्याने स्वीकृत करण्यात आले.