संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या आवाजाने ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या प्रसारणास प्रारंभ
पिंपरी, दि. ३०(पीसीबी) : इन्फिनिटी ९०.४ एफ. एम. कम्युनिटी रेडिओ केंद्र पिंपरी चिंचवड शहराच्या सेवेत तत्पर आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीस हातभार लागेल. शहराचे सांस्कृतिक जीनवमान उंचावण्यास मदत होईल, अशा शब्दात पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ या कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या प्रसारणास प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) ‘पीसीईटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ या कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या प्रसारणास सोमवारी (दि.२९ ऑगस्ट ) संगीतकार डॉ. कुलकर्णी यांच्या आवाजात शुभेच्छा संदेशाने झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आदी उपस्थित होते.
यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे देशात वेगाने विकसित होणारे शहर आहे. अशा शहरात इन्फिनिटी ९०.४ एफ. एम. हे पहिले कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू होणे ही शहराच्या विकासाच्या प्रक्रियेतील महत्वाची घटना आहे. शहराच्या विकासाचे साक्षीदार असणार्या ज्येष्ठांच्या आठवणींचे डॉक्युमेंटेशन, आजी आजोबांच्या गोष्टी, मराठी भाषेतली विविधता, संस्थांर्गत सांस्कृतिक स्पर्धा यांसारखे विविध कार्यक्रम, परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, अर्थ, उद्योग, व्यवसाय शिक्षण, आरोग्य, पर्यावरण असे अनेक उपक्रम या रेडिओ केंद्रावरून प्रसारित करता येतील. तसेच, सध्या सोशल मिडिया म्हणजे चौकात थांबल्यासारखं असतं. कुणीही काहीही प्रसिद्ध करू शकतं. त्यामुळे इन्फिनिटी कम्युनिटी केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे. विशेषतः कार्यक्रमातील शब्दांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, असेही संगितकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
‘रिफलेक्टिंग यू’ हे ब्रीदवाक्य असणार्या कम्युनिटी रेडिओ इन्फिनिटी ९०.४ एफ.एम. हे केंद्र अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे असून समाजाने समाजासाठी चालविलेेला रेडिओ असे याचे स्वरुप आहे. संस्थेतील विद्यार्थी, प्राधापक, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून हे रेडिओ केंद्र चालविण्यात येणार आहे.यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात पहिले रेडिओ केंद्र सुरू करत असल्याचा अभिमान वाटतो. या केंद्रावरून शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, आर्थिक साक्षरता, सामाजिक कार्य, सेवाभावी संस्थांचे उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. या रेडिओ केंद्राचे प्रसारण आकुर्डी येथील संस्थेच्या केंद्रापासून १५ कि.मी. परिसरात ऐकता येईल. शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत अग्रेसर ठरण्यासाठी आणि संस्थेबरोबरच आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास व्हावा या व्यापक उद्देशाने या कम्युनिटी रेडिओची स्थापना करण्यात आलेली आहे. समाजाने समाजासाठी चालविलेला हा रेडिओ प्रत्येकाला आपल्या कलागुणांना तपासून पाहण्याचा आणि ते कलागुण सादर करण्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालेला आहे. संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांसह संस्थेची संबंधित प्रत्येक व्यक्ती या रेडिओच्या कार्यक्रम निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकते. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि परिसरातील तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आणि तिथे व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशा दोन्ही पातळीवर हा कम्युनिटी रेडिओ सक्रिय असणार आहे. प्रास्ताविक माधुरी ढमाले-कुलकर्णी यांनी केले. सूत्र संचालन आनंद बिराजदार, आभार विराज सवाई यांनी मानले.