आता शरद पवार यांचे टार्गेट ठाणे

0
219

ठाणे, दि.३० (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांचे विशेष लक्ष असणार आहे. ठाणे हा महाराष्ट्रातील वेगळा जिल्हा आहे. विविध प्रश्न याठिकाणी आहेत. पुण्यानंतर सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा पक्षाचा निष्कर्ष आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आमचे सरकार असताना पक्षाच्यावतीने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम केले, त्याचा परिणाम हा पक्षाच्या आणि जनमताच्या दृष्टीने आम्हाला अनुकूल असा झाला.

पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनेक जिल्ह्यात जाऊन आले. आताही ते विदर्भ दौरा करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील गडचिरोलीपासून अनेक जिल्ह्यांचा दौरा केला. तेथील स्थितीची पाहणी करुन प्रश्न मांडले. मी देखील काही निवडक जिल्ह्यांमध्ये जाऊन संघटनेचा आढावा घेत आहे. त्याची सुरुवात आज ठाणे जिल्ह्यातून केली, असेही पवार म्हणाले.

आज राज्याचे आणि देशाचे अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्या हातात देश आणि राज्याची सूत्रे आहेत. ते सर्व एका विचाराचे घटक आहेत. केंद्र सरकारने लोकांना अनेक आश्वासने दिली. मात्र, पुढे त्याचे काही झाले नाही. पुढील केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुकीत लोक मतदानातून याची प्रचिती दाखवून देतील. २०१४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने ‘अच्छे दिन’ची घोषणा दिली होती. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना काही जाणवले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत अच्छे दिनचे विस्मरण पडून ‘न्यू इंडिया २०२२’ चे स्वप्न दाखवले गेले.

आता २०२४ साठी ‘५ ट्रिलियन इकॉनॉमी’ करु असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, प्रत्येक घराला शौचालय, वीज, पाणी आणि शंभर टक्के डिजिटल लिटरसी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यातले कोणतेही आश्वासन शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकारने दिलेली आश्वासने आजवर पाळलेली नाहीत. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला, हे देशाला माहीत आहे. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांची हत्या केली गेली. कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील अत्याचार केले गेले. या प्रकरणात सेशन कोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी सर्व आरोपींना कठोर शिक्षा दिली. त्यानंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा आजन्म होती. असे असतानाही गुजरात सरकारने या सर्व आरोपींना सोडून दिले. तसेच सोडल्यावर त्यांचा जाहीर सत्कार केला. मला आश्चर्य वाटले, असा हल्लाबोल पवार यांनी केला.