किरकोळ कारणावरून दोन गटात वाद परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
265

पिंपरी दि. २८ (पीसीबी) -किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील आरोपींनी विरोधी गटातील महिलांशी गैरवर्तन करत त्यांचे विनयभंग केले. ही घटना वाकड मधील अण्णाभाऊ साठे नगर येथे शुक्रवारी (दि. 26) रात्री घडली.

याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, त्यांचे पती, मुलगी घरी असताना आरोपी तिथे आले. फिर्यादी यांच्या मुलाने एका तरुणाला रिक्षा जोरात का चालवतो, असे विचारल्याचे रागातून आरोपींनी त्याला हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला ढकलून दिले. त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. एकाने फिर्यादी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याच्या परस्पर विरोधात 38 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा भाऊ त्यांच्या मेहुणी आणि मेहुण्याला रिक्षातून घरी सोडविण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या 15 वर्षीय मेहुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत जाब विचारला असता आरोपींनी फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. फिर्यादी यांची पत्नी आणि त्यांच्या भावाची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.