तळेगावातील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, बुलढाण्याच्या गुंडाला दिली प्रेयसीच्या खुनाची सुपारी

0
576

– नियोजन करून खून करणा-या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) – प्रेयसीने लग्नाबाबत तगादा लावल्याने प्रियकराने तिच्या खुनाची सुपारी बुलढाणा येथील गुंडाला दिली. चार जणांनी मिळून काटेकोर नियोजन करून महिलेचा 9 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता तळेगाव येथे खून केला. खून करून पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. प्रियकराने प्रेयसीच्या खुनाची सात लाखांची सुपारी दिली असल्याचे तपासात समोर आले आहे.

बजरंग मुरलीधर तापडे (वय 45, रा. तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. बीड), पांडुरंग उर्फ सागर बन्सी हारके (वय 35, रा. मोशी, पुणे. मूळ रा. बीड), सचिन प्रभाकर थिगळे (वय 30, रा. बुलढाणा), सदानंद रामदास तुपकर (वय 26, रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी बजरंग तापडे आणि मयत महिला यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांपासून महिलेने बजरंग याच्याकडे लग्नाबाबत तगादा लावला होता. बजरंग हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. त्याला मयत महिलेसोबत लग्न करणे शक्य नसल्याने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पांडुरंग हारके याला सात लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील चार लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले. पांडुरंग याने त्याचा ओळखीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी सचिन याला हे काम दिले. आळंदी येथे झालेल्या मिटिंगमध्ये पांडुरंग याने सचिन याला महिलेचा फोटो, नाव, पत्ता, जाण्या-येण्याचा मार्ग अशी सर्व माहिती दिली. त्यांनतर तळेगाव दाभाडे येथे सचिनला नेऊन महिलेला प्रत्यक्ष दाखवले आणि एक लाख रुपये आगाऊ रक्कम दिली.

सचिन याने त्याचा मित्र सदा याच्यासोबत मिळून महिलेच्या मार्गाची, तिच्या वडिलांच्या दुकानाची रेकी केली. खून केल्यानंतर पळून जाण्याचा मार्ग कोणता असेल याचीही आरोपींनी तयारी केली. 9 ऑगस्ट रोजी सकाळी महिला तिच्या वडिलांच्या दुकानात दूध पिशव्या विक्रीसाठी पोहोचवून घरी जात असताना आरोपींनी तिचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला आणि दुचाकीवरून आरोपी पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट पाचने देखील याचा समांतर तपास करून तिघांना अटक केली. तर तर तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली.