बहुविद्याशाखीय द्दष्टि कोणाशिवाय संशोधन नाही : डॉ. पंडित विद्यासागर

0
199

पीसीसीओईआर येथे ‘एशियानकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिका, इंग्लंड मधील संशोधकांचा सहभाग

पिंपरी, दि. २७(पीसीबी) – मागील काही वर्षात इलेक्ट्रॉनिक्स हे क्षेत्र झपाट्याने विस्तारतेय. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर वाढत आहे. वर्तमानातील संशोधनामध्ये अंतःविषय व बहुशाखीय द्दष्टिकोणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे शुक्रवारी (दि.२६) ‘एशियानकॉन २०२२’ या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयईईई मुंबईचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण, डॉ. चाणक्य झा, आयआयआयटी धारवाड चे प्रा. सुनील सौम्या, पीसीसीओईआर प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, एच.ओ.डी. डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता, इमेज प्रोसेसिंग, मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग या तंत्रज्ञानावर डॉ. विद्यासागर यांनी प्रकाश टाकला. तसेच विज्ञान, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात वापर होेत असताना मानवी मुल्यांचा विसर पडायला नको, नाहीतर चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था होईल असेही डॉ. विद्यासागर यांनी यावेळी सांगितले.

आयईईई चे डॉ. सत्यनारायण यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. आयईईई च्या वतीने विद्यार्थांना केंद्रस्थानी ठेवून परिषदांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गुणवत्ता वाढीस मदत होते. त्यामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळत असल्याचेही डॉ. सत्यनारायण यांनी यावेळी सांगितले. या परिषदेत एकूण १२७८ शोधनिबंध आले होते. त्यापैकी २७८ संशोधकांनी प्रसिद्ध केले. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रिया, टर्की, ब्राझील, मलेशिया, फिलीपिन्स आदी देशांतील संशोधक या परिषदेत सहभागी झाले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी परिषदेचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वागत प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रास्ताविक डॉ. राहुल मापारी, सुत्रसंचालन त्रिवेणी ढमाले यांनी केले.