भाजपच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडा : अजित गव्हाणे

0
408

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवडचा नारा देऊन २०१७ ला सत्तेत आलेल्या भाजपाने अक्षरशा भ्रष्टाचाराचा हैदोस मांडून महापालिका लुटण्याचा विक्रम केला. त्यांचा हा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडून पोलखोल करत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निगडी येथे केले.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या मासिक सभेच्या निमित्ताने दुर्गानगर येथील सीजन बँक्वेट हॉलमध्ये ते बोलत होते. गव्हाणे म्हणाले की, एकीचं बळ आणि मिळणार फळ या तत्त्वाने आपण सर्वजण प्रामाणिकपणे शहरवासीयांच्या हितासाठी अजितदादांच्या मार्गदर्शनानुसार काम केलं आहे आणि करीत आहोत. पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची या शहरात सत्ता असताना या शहराचा कायापालट आणि विकास अत्यंत गतिमान पद्धतीने झाला आहे. पण, मागील पाच वर्षात भाजपने मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा किळसवाना कळस केला आहे. तो जनतेसमोर प्रत्येक कार्यकर्त्यांने मांडला पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीने केलेल्या विकासाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले.

या मासिक सभेला माजी महापौर मंगल कदम, अपर्णा डोके, नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, वैशाली काळभोर, कविता आल्हाट, शमीम पठाण, राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, अरुण बोराडे, नारायण बहिरवाडे, प्रकाश सोमवंशी, फजल शेख, वर्षा जगताप, इम्रान शेख, यश साने याचबरोबर पक्षाचे अनेक आजी-माजी नगरसेवक आजी-माजी पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित गव्हाणे शहराध्यक्ष झाल्यानंतर सुरू झालेल्या या मासिक सभा उपक्रमाला कार्यकर्त्यांमधून मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र याप्रसंगी दिसून आले.

या सभेत निवडणुकीची तयारी कशी करावी, या विषयावर माझी महापौर मंगल कदम यांनी, त्याचबरोबर बुथ कमिटी नियोजन याबाबत प्रशांत शितोळे व अरुण बोराडे यांनी, त्याचप्रमाणे पक्षाचे चौका चौकात फलक व त्याचे महत्त्व या विषयावर नारायण बहिरवाडे यांनी मार्गदर्शन केले. पक्षप्रवक्ते मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शहराध्यक्षांच्या सर्व प्रभागातील होणाऱ्या दौऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.

राजेंद्र जगताप, शशी किरण गवळी, मनोज माछरे, उदय पाटील, काशिनाथ जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले तर, आभार प्रदर्शन ज्योती तापकीर यांनी केले.
चौकट -कोथुर्णे घटनेतील नराधमास कठोर शिक्षा करण्याचा ठराव मंजूर

मासिक सभेच्या सुरुवातीलाच मावळ मधील कोथुर्णे गावातील त्या चिमुरड्या निर्भयाला श्रद्धांजली वाहून या गुन्ह्यातील नराधमास कठोर शिक्षा व्हावी, महाविकास आघाडी सरकारने तयार केलेला शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करावा, या संदर्भात त्वरीत निर्णय घ्यावा, असा ठराव विनायक रणसुभे यांनी मांडला. त्यास नारायण बहिरवाडे यांनी अनुमोदन दिले.