अमेरिकेतील विद्यार्थ्यांचे कर्ज होणार माफ, जो बायडेन यांची विशेष घोषणा

0
331

विदेश,दि.२६(पीसीबी) -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केलीये. जो बायडेन यांनी विद्यार्थ्यांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा केलीये. निवडणुकीदरम्यान जो बायडेन यांचं हे मोठं वचन होतं जे त्यांनी पूर्ण केलंय. अमेरिकन सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या माजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या कर्जात तब्बल 10,000 डॉलर्स माफ करणार आहे. 2020 मध्ये जो बायडेन ही प्रतिज्ञा केली होती. या निर्णयाचं कौतुकही केलं जातंय त्याचबरोबर याला विरोध देखील केला जातोय. काही अर्थतज्ज्ञांनी असे म्हटले आहे की यामुळे महागाई वाढू शकते. जो बायडेन यांना या निर्णयाचा नक्कीच राजकीय फायदा होणारे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या निवडणुकीत त्यांच्या सहकारी डेमोक्रॅट्सना या निर्णयामुळे पाठिंबा मिळू शकणार आहे.

राष्ट्राध्यक्षांना कर्ज रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? असाही प्रश्न आता विचारला जातोय. कर्ज माफीमुळे नवीन ग्राहक खर्चासाठी शेकडो अब्ज डॉलर्सची मुक्तता होईल ज्याचा उपयोग घरखरेदी आणि इतर मोठ्या तिकिटांच्या खर्चासाठी होऊ शकतो, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे, ज्यांनी असे म्हटले आहे की यामुळे देशाच्या महागाईत झपाट्याने वाढ होऊ शकते. दरम्यान हा निर्णय “अशा कुटुंबांसाठी आहे ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे – महामारीच्या काळात विशेषत: कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसला,” असे बायडन यांनी व्हाईट हाऊसमधील भाषणादरम्यान म्हटले आहे. या योजनेवर झालेल्या केंद्रीय टीकेला उत्तर देताना त्यांनी कोणत्याही उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबाला फायदा होणार नाही, असे वचन दिले आहे. रिपब्लिकन्सनी मुख्यतः विद्यार्थ्यांच्या कर्जाच्या माफीला विरोध केला आणि त्याला अन्यायकारक म्हटले, कारण यामुळे जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांना अवाजवी मदत होईल.