समुद्रकिनारी बांधलेले कोट्यवधी किंमतीचे अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही

0
253

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरीच्या दापोलीमधील रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.

सोमय्या पुढे म्हणाले की, माजी मंत्री परब यांच्या रिसॉर्टची फायल आता पर्यावरण मंत्रालयाकडे आलेली आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश आजच पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात येणार आहेत. पुढच्या आठवड्यात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हे रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार की जिल्हाधिकारी कार्यालय टेंडर काढून ते पाडणार, याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्यावर कार्यवाही होणार आहे. मी शनिवारी दापोलीत जाणार आहे. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासात जमा होईल. तसेच, परब यांचा रिसॉर्ट पडणार आहेच. पण, रिसॉर्टसाठी पैसे कोठून आले, याचा तपासही आता वेगात होणार आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला.

कोविड गैरव्यवहार प्रकरणातील सुनावणीत ३२ कोटी ५३ लाख रुपये सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यात वरळी कोविड सेंटरचे ४ कोटी ५७ लाख रुपये होते, त्याबाबतचे पुरावे आज आम्ही वकिलाच्या माध्यमातून दिले आहेत. आज पोलिस नसल्यामुळे सुनावणी ३० ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवलेली आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे, असे पोलिस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. हा अजामीनपात्र गुन्ह असल्याने सुजीत पाटकर यांना दोन ते चार दिवसांत अटक होईल, अशी शक्यता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.कोविड गैरव्यवहार प्रकरणातील ईडी आणि इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनीही लक्ष घालावे, यासाठी मी संबंधितांशी चर्चा केली आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.