नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : राजकारणाचा पुरता बाजार कसा होत चालला आहे ते महाराष्ट्रातील सत्तांतरात जनतेने पाहिले. त्यावेळी प्रत्येक फुटीर आमदाराला ५० खोके (कोटी) भाजपाकडून मिळाल्याची चर्चा होती, आता नवी दिल्लीतील अरविंद केजरिवाल यांचे आमदार फो़डण्यासाठीही तोच फंडा भाजपा वापरत असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
आम आदमी पार्टी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून आरोप – प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच भाजपकडून आपच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपकडून प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी भाजपवर केला आहे.
“दिल्ली सरकार पाडण्यासाठी भाजपने आठशे कोटी खर्च करणार आहेत. आपचे ४० आमदार फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी २० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव भाजपचा आहे. हे आठशे कोटी जनतेचे आहेत. दिल्ली सरकार पाडण्यासाठी त्यांनी जनतेचा हा पैसा कुठे ठेवला आहे,” असे टि्वट केजरीवाल यांनी केले आहे. “सरकार स्थिर आहे, कोणताही आमदार फुटलेला नाही. दिल्लीत सुरु असलेली सर्व चांगली कामे सुरु राहतील,” असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
दुसरीकडे भाजपच्या हातात आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप कडून धमक्यासुद्धा दिल्या जात आहेत, असा सुद्धा आरोप आपकडून भाजपवर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलावली होती.
या बैठकीला ४० आमदार गैरहजर असल्याचे वृत्त पसरले आहे. या आमदारांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या आमदारासोबत महात्मा गांधी यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाट येथे गेले आहेत. येथे त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपने आपच्या ४० आमदारांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे आमदार आपच्या सोबत आहेत, असे केजरीवाल यांनी माध्यमांना सांगितले.
“दारु विक्रीतीलघोटाळ्यावरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी आपचा हा डाव आहे, ” असे भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी आपच्या आमदारांची बैठक बोलावली होती, बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते, असे आपच्या नेत्यांनी सांगितले.८ आमदार दिल्लीच्या बाहेर असून मनीष सिसोदिया हिमाचल, राम निवास गोयल अमेरिकेत आहेत. मात्र, या सर्वांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजेरी लावली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण ६२ आमदार आहेत.
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील आमदारांनाही भाजप खरेदी करेल अशी भिती आपला वाटत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने पॉलिटीकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत सर्व आमदारांच्या बैठकीचं नियोजन केलं होतं. यानुसार, आज केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली.राजघाटावर माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केला आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने त्यांची १२ तास चौकशी केल्यानंतरही त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
“भाजपने मनीष सिसोदिया यांना आप आणि केजरीवाल यांना सोडण्यासाठी सांगितले होते. सिसोदिया हे आपच्या काही आमदारांसोबत भाजपमध्ये प्रवेश करावा व सिसोदिया यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती.पण तसे झाले नाही,”असे केजरीवाल यांनी सांगितले. सिसोदिया यांच्याविरोधातील दाखल झालेले सगळे गुन्हे रद्द करण्याची आमिष त्यांना भाजपने दाखवले होत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
“आमच्या कुठल्याही आमदाराने भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. दिल्लीतील जनतेने एका प्रामाणिक पक्षाला निवडणूक दिले आहे. आम्हाला मरण आले तरी चालेल पण आम्ही जनतेचा विश्वासघात करणार नाही,” असे केजरीवाल म्हणाले.