पिंपरी दि. २५(पीसीबी) – पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची 23.3 किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी 40 महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.
पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सदस्य सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.












































