श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून

0
293

पिंपरी दि. २५ (पीसीबी) – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती पालखीची भाद्रपद यात्रा येत्या रविवारपासून (दि.28) सुरू होत आहे. सहा सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली. पालखी सोहळ्याचे वेळापत्रकही त्यांनी यावेळी जाहीर केले.

पालखी प्रस्थानाच्या निमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल पथक सहभागी होणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. सोमवारी (दि.29) पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान ठेवेल. कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल.

पालखी मंगळवारी (दि.30) सकाळी मंदिरातून शिवरी, रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. त्यानंतर बुधवार (दि.31) आणि गुरुवारी ( 1 सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. 2 सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री कऱ्हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम-वडकी या ठिकाणी मुक्काम करीत 6 सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल. यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी केले आहे.