पिंपरी दि. २३ (पीसीबी) -महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तोफ धडाडणार आहे . नाशिक दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्ते, पदाधिऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिंदे-फडणवीस सरकार, प्रभाग रचना यासह इतर मुद्यांवर त्यांनी कानपिचक्या दिल्या. कोपरखळी मारली. सडेतोड बोलण्यासाठी राज ठाकरे ओळखल्या जातात. मंगळवारी मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणानं रंगत आणली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज ते आज पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणुका लढवण्याचे आवाहन केले. त्याचवेळी अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका, असा सल्ला ही दिला. तुम्ही अॅडजेस्टमेंट केली तर या गोष्टी लपून राहत नाही. त्या कधी न कधी बाहेर येतात, त्यामुळे तुमची किंमत शून्य होईल असे सांगायला ही ते विसरले नाहीत. या निवडणुका तुम्ही ताकदीने लढवा. आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असा विश्वास ही त्यांनी दिला. मला शक्य होईल तिथे सभा घेईल. अनेक ठिकाणी मेळावे सुरू करणार आहे. अनंत चतुर्दशी झाल्यावर आपण मेळावे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राज्यातील सत्ताबदलावर त्यांनी थेट बोलणं टाळलं असलं तरी सरकारच्या काही निर्णयाचा त्यांनी त्यांच्या अंदाजात खरपूस समाचार घेतला. महापालिका निवडणुकीवर मनसेने लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर ही त्यांनी सडकून टीका केली. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताकारणात ही मनसे पुन्हा सक्रीय भूमिका घेणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पुन्हा आपल्या हातात सत्ता देण्याचा आवाहन केले आहे. ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी राज्याचं काय मातरं केलं हे सांगायला ही ते विसरले नाहीत. तसेच सत्ता हातात दिल्यास राज्यातील टोल बंद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. एकंदरीतच मनसे आगामी विधानसभा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकांसाठी राज्यभर ताकद उभी करणार हा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला आहे.