पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – राजस्थान मधील दलित विद्यार्थ्यांला जातीयवादातून शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीतून झालेल्या हत्येचा व बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील हत्या प्रकरणात आरोपींना देण्यात आलेल्या माफीच्या निषेधार्थ शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आज (सोमवारी) आंदोलन केले.
शहरातील पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
मानव कांबळे यांनी या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त करून राजस्थान मधील जातीय अत्याचारातून झालेल्या मृत विद्यार्थ्याच्या कुटूंबियांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई व शासकीय नोकरी सरकारने द्यावी. तसेच बिल्कीस बानो प्रकरणातील मुक्तता केलेल्या गुन्हेगारांची माफी रद्द करून पुन्हा कारावासात पाठवावे अशी मागणी केली.
आंदोनात माजी नगरसेवक मारुती भापकर , संदीपान झोंबाडे, प्रकाश जाधव , डॉ किशोर खिल्लारे, अर्पणा दराडे , रुईनाज शेख , धम्मराज साळवे , सचिन देसाई , गणेश दराडे , सुरेश गायकवाड , प्रदीप कदम यानी निषेधपर विचार व्यक्त केले . प्रदीप पवार, काशिनाथ नखाते ,नीरज कडू, सतिश काळे , गिरीश वाघमारे, नरेंद्र बनसोडे ,दीपक खैरनार, प्रबुद्ध कांबळे,सुलतान तांबोळी, संतोष शिंदे , आकाश शिंदे , सहदेव कसबे उपस्थित होते.