पीओपी मूर्ती उत्पादकांवर कारवाई करु नका; राज्य शासनाचे तोंडी आदेश, अधिका-यांची कोंडी

0
239

पिंपरी दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात कोणीही पीओपी मूर्तीचे उत्पादन करू नये. पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन केल्यास स्टॉलला परवानगी देणार नसल्याचे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले मात्र, राज्य शासनाने तोंडी आदेशामुळे शहरात यंदा तरी पीओपी गणेश मूर्ती उत्पादन करणाऱ्यांवर, स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही. तोंडी आदेशामुळे महापालिका अधिका-यांची कोंडी झाली आहे.

पीओपीच्या मूर्तीसाठी केमिकलयुक्त रंग वापरण्यात येतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हा धोका ओळखून पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. मात्र, पीओपीची मूर्ती पर्यावरणाला घातक, वजनाने हलकी, दर कमी व कमी कालावधीत अधिक मूर्ती तयार होतात. त्यामुळे बहुतांश कारागीर अशा मूर्तीना प्राधान्य देतात. मातीकाम करणारा कारागीर दिवसाला एक ते दोन मूर्ती बनवतो. पीओपीचे काम करणारा कारागीर दिवसाला 20 ते 30 मूर्ती बनवतो. शाडू मातीची एक फुटाची मूर्ती 1000 ते 1200 रुपयांना विकली जाते. या मूर्तीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. मात्र, पीओपीची एक फुटाची मूर्ती 400 ते 1000 रुपयांना मिळते. त्यामुळे अनेक जण पीओपीची मूर्ती घेण्यास प्राधान्य देतात.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शहरातील विविध गणेश मंडळे आणि घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शहरात अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती मिळतात. मात्र, पीओपीच्या मूर्तीची विक्री करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दोन वर्षांपूर्वीच पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. पण, कोरोनामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नव्हती. यंदापासून याची कडक अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.