आढळरावांच्या घरी जाण्याआधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी

0
390

पुणे, दि. २० (पीसीबी) : ज्यासाठी अट्टहास केला नेमके त्याच्याच उलटे घडावे, अशी परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यात झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या त्रासाला (खरे वळसे पाटलांच्या) कंटाळून शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गेले. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले. मुख्यमंत्री हे भीमाशंकरच्या दर्शनाला येण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्याही निवासस्थानी भेट द्यावी, अशी विनंती आढळरावांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य देखील केली. पण आढळरावांच्या घरी जाण्याच्या आधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी भेटले आणि तेथेच चर्चा सुरू झाली. राजकीय पटलावर या भेटीचे पडसाद उमटले नाही तरच नवले. आढाळराव यांचा डाव फसल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खसखस पिकली होती.

भीमाशंकर येथे दर्शनासाठी शिंदे आज सायंकाळी मंचर येथे आले. तेथे जाण्यापूर्वी ते लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या बंगल्यावर जाणार होते. तेथे ते भोजनही करणार असल्याची माहिती आढळराव पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली होती. त्यामुळे सर्व पत्रकार लांडेवाडी येथेच होते. पण अचानकपणे दौऱ्यात बदल झाला आणि मुख्यमंत्री हे थेट वळसे पाटील यांचे निवासस्थानी आले. नंतर त्यांनी व ळसे पाटील यांच्या समवेत नाश्ताही घेतला. पण नेमकी आत काय चर्चा झाली याविषयी मात्र माहिती उपलब्ध झाली नाही.

मंचर शहरात फटाक्याची आतषबाजी करत शिंदे गट शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत या वेळी करण्यात आले. भाजपच्या नेत्या आशा भोसले संजय थोरात विजय पवार जयसिंग एरंडे, शिवसेनेचे अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह हजारो कार्यकर्ते रस्त्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मुख्यमंत्र्यासोब त्यांच्या पत्नी आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील होते.