फडणवीस यांची पुणे मोहिम, खरे काय ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
457

मोदी यांच्या नंतर कोण अशी चर्चा सुरू असते, त्यावेळी नितीन गडकरी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येते. मोदी मंत्रीमंडळातील सर्वात कार्यक्षम तसेच सर्व समावेशक नाव म्हणून विरोधकांतूनही गडकरी यांचे नाव पहिल्या पसंतीचे होते. कोण किती काम करते याचे सर्वेक्षण केले तर तिथेही गडकरी यांचेच नाव अग्रभागी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनही गडकरी यांच्याच नावावर मोहर उमटणार अशी शक्यता होती. थोडक्यात मोदींचे वारसदार म्हणून गडकरी हेच कसे चांगले यावर एकमत होताना दिसले. तिथेच माशी शिंकली आणि भाजपाच्या संसदिय समितीतून गडकरी यांना वगळून त्या जागेवर फडणवीस यांना संधी देण्यात आले. थोडक्यात मोदींना पर्याय म्हणून नाव पुढे आले त्याचा मोठा फटका गडकरी यांना बसला. दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तांतराचे खरे सूत्रधार फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही म्हणून ते नाराज होते, त्यावर संसदिय समितीत घेऊन त्यांना बक्षिस देण्यात आले. आता मोदींच्या नंतर फडणवीस हेच देशाचे पुढचे पंतप्रधान असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. स्वतः गडकरी यांनी नागपूर येथे भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना एक गौप्यस्फोट केला. उद्या फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे गडकरी म्हणाले. अगदी केंद्रात ठरल्याप्रमाणेच सगळे पध्दतशीर सुरू आहे.

शिंदे- फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला आणि लोगलेग एक बातमी आली की, पुणे शहराचे पालकमंत्री चद्रकांत पाटील नसतील तर फडणवीस असतील. त्यावर चर्वीतचर्वण सुरू झाले आणि त्याचे तरंग उमटू लागले. स्वतः फडणवीस यांनी कार्यक्रमांचे निमित्त करून पुणे शहर भेटीगाठी सुरू केल्या. आता लगोलग तिसरी मोठी बातमी येऊन धडकली. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांना पत्र दिले आणि फडणवीस यांना पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर फडणवीस हे उमेदवार असतील तर त्यांना निवडूण आणायची जबाबदारी ब्राम्हण महासंघ घ्यायला तयार असल्याची ग्वाही कुलकर्णी यांनी दिली. पुणे शहर हा भाजपासाठी तसा सुरक्षित मतदारसंघ कारण संघ आणि भाजपाची मोठी ताकद आहे. ब्राम्हण समाजाचे निर्णायकी मतदान इथे आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपाच्या ताब्यात होत्या. शहरात काँग्रेसचे सुरेश कलमाडी, विठ्ठल तुपे यांच्या नंतर कायम भाजपाचे खासदार निवडूण आले आहेत. अण्णा जोशी, प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि आताचे गिरीश बापट यांनी खासदार म्हणून केलेले कामं लोकांसमोर आहे. मेट्रो सह विविध मोठ्या प्रकल्पांचे श्रेयसुध्दा भाजपालाच जाते. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यासाठी पुणे सुरक्षित असल्याचा सूर आहे.

राजकीयदृष्ट्या शरद पवार, अजित पवार यांचे बालेकिल्ला असलेले पुणे शहर जिल्हा एकहाती भाजपाच्या ताब्यात घेणे आता सोपे आहे. पुणे, बारामती, शिरूर, मावळ असे चारही खासदार, १८ आमदार, दोन महापालिका, १० नगरपालिका, तीन कँन्टोमेंट असे मोठे साम्राज्या मिळाले तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सुरूंग लागेल, अशीही भाजपाची अटकळ आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील जिल्हे भाजपामय करायचे तर पुण्याचे पूर्ण राजकारण हातात आले पाहिजे. आगामी काळात महाराष्ट्रातून ४८ पैकी सर्वाधिक भाजपा खासदार निवडूण आणायचे तर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला नामोहरम करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच फडणवीस यांच्याकडे पुणे काबिज करण्याची मोहिम सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत. ईडी च्या कारवायांमुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोहरे जायबंदी झाले. लवासा प्रकरणात स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबाला घेरण्याची व्युहरचना सुरू आहे. राष्ट्रवादीची बूलंद तोफ आणि पवार यांचे नाक असलेल्या अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करून आवाज बंद करण्याचे कारस्थान आता मोहित कंबोज करत आहेत. पूर्वी हेच काम किरीट समोय्या करायचे आता कंबोज यांच्याकडे ईडी, सीबीआय च्या फायली हालवायच्या आणि विरोधकांना जेरीस आणायचे काम सोपविल्याचे दिसते. पुणे शहरातील गोकुळाष्टमी, दहिहंडी सोहळ्याला फडणवीस यांच्या धर्मपत्नी अमृता यांची हजेरी ही सुध्दा या सर्व हालचालींचाच एक भाग आहे. फडणवीस पुणे मोहिमेवर निघण्यापूर्वी आता नगारे झडू लागलेत. स्वतः फडणवीस हे केंद्रात जायला तयार झालेत की नाही, नागपूर सोडून पुणे शहरातून लढणार की नाही याबाबत अद्याप एका शब्दानेही वाच्यता केलेली नाही. कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना पुणे मोहिमेवर धाडले होते, पण त्यांच्याबाबत पुणेरी मंडळींनी काहीसे नाक मुरडले. आता फडणवीस यांच्यासाठी लाल पायघड्या अंथरणार का ते पहायचे. एक मात्र नक्की, फडणवीस इथे यशस्वी झालेच तर, त्यांना २०२४ नंतर दिल्ली दूर नाही.